पनवेलमध्ये ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन; अभिनेते शरद पोंक्षे यांची उपस्थिती
रायगड, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त पनवेलमध्ये भव्य सामूहिक ‘वंदे मातरम्’ गान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर
Collective singing of ‘Vande Mataram’ in Panvel – Presence of actor Sharad Ponkshe and Minister Ganesh Naik


रायगड, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त पनवेलमध्ये भव्य सामूहिक ‘वंदे मातरम्’ गान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख संयोजनाखाली हा कार्यक्रम शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता नवीन पनवेल येथील के. ए. बांठिया शाळेच्या प्रांगणात होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पनवेल परिसरातील नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व विविध सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. ‘वंदे मातरम्’ गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्यभरात या गीताच्या सामूहिक गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संयुक्त संकल्पनेतून या उपक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप देण्यात आले आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ‘वंदे मातरम्’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७५ साली लिहिलेले हे गीत आजही देशभक्तीचा दीप प्रज्वलित ठेवते. त्याच परंपरेला पुढे नेत, राष्ट्रप्रेमाची नवी उमेद जागृत करण्यासाठी पनवेलमध्ये हा भव्य उपक्रम राबविला जात आहे. भाजप युवा मोर्चा पनवेल तालुका ग्रामीण विभागाचे सरचिटणीस विश्वजीत पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “राष्ट्रगीतापासून राष्ट्ररक्षणापर्यंतच्या मूल्यांचा संदेश देणाऱ्या या सामूहिक गायनात प्रत्येक देशभक्त नागरिकाने सहभागी व्हावे.” ‘वंदे मातरम्’च्या घोषात पनवेल पुन्हा एकदा देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande