
मुंबई, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या माध्यमात आल्यानंतर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना संपर्क साधून या विषयावर चर्चा केली. या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश आज दिले.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात आल्यानंतर जालना पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच जालन्याच्या पालकमंत्री म्हणून मुंडे यांनी लगेचच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना फोनवरून संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. हा प्रकार अतिशय गंभीर असून याचा सखोल तपास करावा तसेच जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करावी असे आदेश त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी