
रायगड, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सत्य, जबाबदारी आणि परिवर्तन” या पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांना नव्या युगातील दिशा देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन २०२५’ हे ऐतिहासिक अधिवेशन १५ व १६ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. “चलो पंढरपूर! चलो पंढरपूर!! चलो पंढरपूर!!!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली हे अधिवेशन राज्यभरातील पत्रकारांना एका व्यासपीठावर एकत्र आणणार आहे.
“नवा विचार, नवी दिशा — पंढरपूरात भेटूया!” या बोधवाक्याने सजलेल्या या अधिवेशनात पत्रकारितेतील नवनव्या प्रवाहांवर चर्चा होणार असून, बदलत्या काळातील माध्यमांच्या जबाबदाऱ्या आणि सत्याधिष्ठित पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सोशल मीडिया पत्रकार, संपादक, फोटोजर्नलिस्ट आणि विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अधिवेशनात पत्रकारांच्या हक्क, सुरक्षितता, मीडिया नीती, तांत्रिक प्रगती, ग्रामीण पत्रकारितेची आव्हाने आणि जबाबदार बातमी लेखन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनात विविध सत्रांमध्ये प्रख्यात संपादक, वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ञ सहभागी होणार आहेत. संवाद, चर्चासत्रे, अनुभवकथन आणि पत्रकार सन्मान कार्यक्रम हे अधिवेशनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.
पत्रकार बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, “सत्यासाठी चालणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने या यात्रेत सहभागी होऊन नव्या विचारांना दिशा द्यावी आणि माध्यम क्षेत्रात परिवर्तनाचा दीप प्रज्वलित करावा.” पंढरपूरच्या पवित्र भूमीत पत्रकारितेच्या नव्या दिशा ठरवणारे हे अधिवेशन “व्हॉईस ऑफ मीडिया” या नावास खऱ्या अर्थाने साजेसे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके