
मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। : दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून देणे, हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तींना योजनांची माहिती मिळवताना किंवा तक्रारी दाखल करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या चॅटबॉटमध्ये भाषिणी तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आहे, असे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
सचिव मुंढे म्हणाले, या चॅटबॉटच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची माहिती आता दिव्यांग व्यक्तींना जलद गतीने मिळू शकते. यामुळे तक्रार नोंदवून तिची सद्यस्थिती जाणून घेणे आता सोयीचे झाले आहे. ‘सेल्फ-ट्रॅकिंग’ सुविधेमुळे तक्रारीची सद्यस्थिती थेट व्हाट्सॲपवर तपासता येईल. ‘भाषिणी’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, टाईप करणे शक्य नसलेल्या व्यक्ती आपली तक्रार मराठी किंवा इंग्रजी भाषेत फक्त आवाज रेकॉर्ड करून पाठवू शकतात.
शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा चॅटबॉट तयार करण्यात आला असून हा चॅटबॉट इतर चॅटबॉटपेक्षा वेगळा आहे. यात प्रगत एआय मॉडेलचा वापर केला आहे, जे वापरकर्त्याची भाषा, संदर्भ आणि तक्रारीच्या विषयाची गंभीरता ओळखून तक्रारीचे आपोआप वर्गीकरण करते व संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते. संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासात तक्रारीची दखल घेणे बंधनकारक आहे.
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांना तक्रार निवारणासाठी विशेष डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसेच विभाग साप्ताहिक स्तरावर सर्व तक्रारींचा आढावा घेणार असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर