
गडचिरोली, 7 नोव्हेंबर (हिं.स.)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सिरोंचा-अंकिसा राष्ट्रीय महामार्गावरील राजेश्वरपल्ली येथे तब्बल ₹१४६८ कोटींच्या गुंतवणुकीतून भव्य वैद्यकीय आणि शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
त्यासोबतच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथील महिला रुग्णालयाचे उद्घाटन देखील होणार आहे.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या या भागातील नागरिक आरोग्य आणि उच्च शिक्षणाच्या सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित होते.
सध्या शस्त्रक्रियेसाठी किंवा प्रसूतीसाठीही येथील नागरिकांना २५० ते ४०० किलोमीटर दूर असलेले हैदराबाद, नागपूर, चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे जावे लागत होते.
वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.
या नव्या प्रकल्पामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य आणि शिक्षण सुविधांची उपलब्धता वाढणार आहे, ज्यामुळे या परिसराची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond