
मॉस्को , 11 डिसेंबर (हिं.स.)।रशियातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक, सेंट पीटर्सबर्ग येथे बुधवारी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. भीषण स्फोटानंतर बाजाराला आग लागली आणि संपूर्ण मार्केट कॉम्प्लेक्समध्ये गोंधळ उडाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. हि घटना समजताच बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली.
रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी सेंट पीटर्सबर्ग शहरातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एका बाजारात मोठी आग लागली. आग लागण्यापूर्वी घटनास्थळी सलग अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर संपूर्ण मार्केट कॉम्प्लेक्स आगच्या ज्वाळांनी वेढला गेला. घटनेनंतर अग्निशमन दल तातडीने तेथे दाखल झाले.मंत्रालयानुसार, आग विझवण्यासाठी 96 अग्निशमन कर्मचारी आणि 26 यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार एक व्यक्ती जखमी झाला आहे. किमान एका व्यक्तीच्या मृत्यूचीही माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात बाजारात झपाट्याने पसरत असलेली आग स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये उंच उंच ज्वाळा आणि दाट काळा धूर रात्रीच्या अंधारात पसरताना दिसतो.रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्याठिकाणी आग लागली ती इमारत अत्यंत ज्वलनशील पदार्थांनी भरलेली होती, त्यामुळे आग वेगाने पसरली. या आगीमुळे सेंट पीटर्सबर्गमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या आग लागण्याच्या कारणांबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती देण्यात आलेली नाही. नेवस्की जिल्ह्याचे अभियोजक कार्यालय या घटनेच्या कारणांची चौकशी करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode