
पुणे, 12 डिसेंबर, (हिं.स.)। जपानमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आणि १६ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार प्राप्त ‘ड्रॅगन हार्ट – अॅडव्हेंचर्स बियॉन्ड धिस वर्ल्ड’ या अॅनिमेशन चित्रपटाचा हिंदी डबिंग आवृत्ती येत्या २५ डिसेंबर रोजी भारतीय टेलिव्हिजनवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला ९८ व्या अकादमी पुरस्कारांच्या फीचर अॅनिमेशन श्रेणीत पात्रता मिळाल्याने त्याबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये बॉलीवूडमधील ज्येष्ठ गायक आणि डबिंग आर्टिस्ट सुदेश भोसले यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कोटा नोगुची (जपानी, दक्षिण आशिया हॅपी सायन्सचे प्रादेशिक संचालक).शिंदो इतो (जपानी, जपानमधील हॅपी सायन्सच्या नासू प्रमुख ), माई अरिमोटो (जपानी, जपानमधील हॅपी सायन्सचे अधिकारी आणि शिंदो इतोचे भाषांतरकार), नाओको इतो (जपानी, जपानमधील हॅपी सायन्सचे स्टाफ ), नीता कालवे आदि मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शन इसामू इमाकाके, तर कथा व निर्मिती र्युहो ओकावा यांची आहे.
धर्म, कर्म, आध्यात्मिक न्याय, भीतीवर मात आणि जीवनातील ध्येय शोधणे यांसारख्या भारतीय मूल्यांशी या चित्रपटाचा सखोल संबंध आहे. त्यामुळे विद्यार्थी, कुटुंबे, तरुण आणि आध्यात्मिकता समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा चित्रपट खास आहे. १४ वर्षांचा र्युसुके आणि त्याचा चुलत भाऊ तोमोमी नदीतील अपघातानंतर एका आध्यात्मिक आणि रहस्यमय जगात पोहोचतात. त्यांना एका दैवी ड्रॅगनकडून संरक्षण मिळते आणि दहशतवादाचे जग, गंजाचे जग, शांग्री-ला, शंभला आणि पवित्र मेरू पर्वत अशा विविध जगांतून मार्गदर्शन केले जाते. भीती, करुणा, न्याय आणि जीवनाच्या उद्देशासंदर्भातील सार्वत्रिक सत्ये उलगडत हा प्रवास पुढे सरकतो.
‘ड्रॅगन हार्ट – अॅडव्हेंचर्स बियॉन्ड धिस वर्ल्ड’ या चित्रपटाला १६ जागतिक महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वोत्तम अॅनिमेशन, सर्वोत्तम आध्यात्मिक चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक यांसारखे अनेक पुरस्कार आहे. तसेच हा चित्रपट या दशकातील सर्वाधिक मान्यता मिळालेल्या जपानी आध्यात्मिक अॅनिमेशन चित्रपटांपैकी एक आहे.
‘ड्रॅगन हार्ट – अॅडव्हेंचर्स बियॉन्ड धिस वर्ल्ड’ च्या हिंदी आवृत्तीचे प्रसारण उत्सव केबल (हाथवे) २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वा. तर एमसीएन (महाराष्ट्र ) वाहिनीवर २५ डिसेंबर – ६ वा., २६ डिसेंबर – ६ वा., २७ डिसेंबर – ११ वा. व ६ वा., २८ डिसेंबर – ११ वा. व ६ वा., ३० डिसेंबर – ६ वा. आणि ३१ डिसेंबर – ६ वा.होणार आहे. असेही चित्रपटाच्या टीमने सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर