कोल्हापूर - जिल्हा क्रीडा सप्ताहास उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १६ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून विविध क्रीडा उपक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि. १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हाप
क्रीडा सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन


कोल्हापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १६ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून विविध क्रीडा उपक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला आहे. दि. १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे क्रीडा सप्ताहाचे तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा सप्ताहाच्या अनुषंगाने १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र हायस्कूल येथे विविध क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. १४ डिसेंबर रोजी नंदिनी जाधव नगर, कळंबा येथे ‘जॉय स्ट्रीट’ कार्यक्रम, तर दि. १५ डिसेंबर रोजी हलकर्णी, ता. चंदगड येथे प्रदर्शनीय क्रीडा सामने आयोजित करण्यात येणार आहेत.

दि. १६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे ‘स्पोर्ट्स सायन्स लॅब’चा परिचय व चर्चासत्र होणार असून दि. १७ डिसेंबर रोजी आजरा येथे आठवणीतील व पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. दि. १८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ मधील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार, क्रीडादूत व उत्कृष्ट स्पर्धा संयोजकांचा सत्कार समारंभ होऊन क्रीडा सप्ताहाचा समारोप होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर क्रीडा सप्ताह साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुका व जिल्हा स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र हायस्कूलचे उपप्राचार्य एस. ए. जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, राज्य क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी अजिंक्य पाटील, महाराष्ट्र हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप साळोखे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा सप्ताहांतर्गत फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या असून एकूण १८ संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामने महाराष्ट्र हायस्कूल येथे खेळविण्यात येऊन बक्षीस वितरण करण्यात आले.

याचबरोबर छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा रस्सीखेच संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी विरुद्ध जिल्हा रस्सीखेच संघटनेचे पदाधिकारी व पंच यांच्यात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विद्या शिरस, जिल्हा क्रीडा अधिकारी, मनीषा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी, चंदगड, सोनल सावंत, क्रीडा कार्यकारी अधिकारी, अरुण पाटील, क्रीडा अधिकारी व अजिंक्य चौगले, क्रीडा विकास अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande