
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : येथील मराठा मंडळ या सेवाभावी संस्थेतर्फे येत्या रविवारी, दि. २१ डिसेंबर रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
मंडळ आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त संस्थेतर्फे रत्नागिरी शहरात प्रथमच मुंबईतील साधना फाउंडेशन आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा भवनच्या वास्तूत हे शिबिर होत असून मुंबईतील नामांकित डॉक्टरांच्या चमूला पाचारण करण्यात आले आहे. अत्याधुनिक उपकरणांसह हा चमू रुग्णांच्या तपासण्या करणार असून, आजपर्यंत कोणत्याही आरोग्य शिबिरात न झालेल्या चिकित्सा व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये स्त्रीरोग चिकित्सा, नेत्रचिकित्सा, कॅन्सर तपासणी, तपासणी, अत्याधुनिक मशीनद्वारे हाडांची संभाव्य विकार तपासणी, जनरल फिजिशिअन, ईसीजी यांचा समावेश आहे.
शिबिराकरिता नागरिकांनी पूर्वनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. याकरिता ८०१०३०८८४६ या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच या वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रूग्णांनी येताना स्वतःचे जूुने रिपोर्ट घेऊन यावे. बिराची वेळ रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी