
जळगाव , 15 डिसेंबर (हिं.स.) जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात एका महिलेसोबतच्या अनैतिक संबंधांच्या वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय ३०) या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली आहे. मयत सागर सोनवणे हा आपल्या आई-वडील व भावासोबत निमखेडी परिसरात वास्तव्यास होता. गेल्या चार वर्षांपासून परिसरातीलच एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. या कारणामुळे कुटुंबात तसेच गावात वारंवार वाद होत होते. नातेवाईकांनी सागरला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने कोणाच्याही सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. याच पार्श्वभूमीवर, निमखेडी येथील रहिवासी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे याच्याशी सागरचे सातत्याने वाद होत होते.
अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर (दोघेही रा. निमखेडी) यांच्यात सागरसोबत पुन्हा एकदा तीव्र बाचाबाची झाली. यावेळी आरोपींनी सागरला “महिलेचा नाद सोड, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी उघड धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धमकीनंतर काही तासांतच रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी निमखेडीतील राम मंदिर परिसरात सागरला गाठले. जुन्या वादातून संतप्त झालेल्या आरोपींनी कोणताही विचार न करता सागरवर धारदार व तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सागर जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ विशाल सोनवणे व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला खासगी वाहनाने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर सागरला मयत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश परिसरातील नागरिकांना हेलावून टाकणारा ठरला.या प्रकरणी मयताचा भाऊ विशाल सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा नोंदताच पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर