
जळगाव, 17 डिसेंबर, (हिं.स.) यावल तालुक्यातील चितोडा येथील एका महिलेने ऑनलाइन ॲपवर फ्लॅट शोधणे महागात पडले आहे.फ्लॅटच्या व्यवहारासाठी महिलेनं एका अज्ञातास तब्बल २ लाख ३८ हजार ३१९ रुपये दिले मात्र, संबधीत व्यक्तीने त्यांचा व्यवहार पूर्ण केला नाही व पैसे देखील परत दिले नाही तेव्हा या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणी नितीन महाजन (वय २९) या महिलेने ६ व ७ डिसेंबर २०२४ रोजी ऑनलाइन अॅपवर फ्लॅट शोधण्यास सुरुवात केली होती. त्यांना तेथे रमाकांत कुमार असे नाव सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. कल्याणी महाजन यांचा विश्वास संपादन करत फ्लॅटचे बुकिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्यांना वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. तेव्हा संबधीत व्यक्तीकडून व्यवहार करत असतांना टोकन रक्कम म्हणून परत मिळणारी रक्कम अर्थात रिफंडेबल रक्कम सांगून एकूण २ लाख ३८ हजार ३९९ रुपये स्वतःच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतरही फ्लॅटचे बुकिंग न झाल्याने आणि संबंधित व्यक्तीशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे कल्याणी महाजन यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर