‘इथेच टाका तंबू’ नाटकाची मुंबईतील नाट्यरतन राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड
नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)। – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने ‘इथेच टाका तंबू’ या दोन अंकी प्रायोगिक नाटकाची निर्मिती केली आहे. पद्मविभूषण रतन टाटा यांच्या स्मरणार्थ मुंबईत येत्या दिनांक २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्
नाशिक


नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.)। – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने ‘इथेच टाका तंबू’ या दोन अंकी प्रायोगिक नाटकाची निर्मिती केली आहे. पद्मविभूषण रतन टाटा यांच्या स्मरणार्थ मुंबईत येत्या दिनांक २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘नाट्य रतन’ या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी या नाटकाची निवड झाली आहे. विद्यापीठ ललित कला केंद्राचे प्रा. दत्ता पाटील लिखित व संचालक श्री. सचिन शिंदे यांचे दिग्दर्शन असलेले हे नाटक या महोत्सवात शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात सादर होईल.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव, शास्त्रोक्त शिक्षण – प्रशिक्षण व व्यासपीठ मिळावे म्हणून विद्यापीठातर्फे ललित कला केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या कौशल्य विकासाच्या अन्य विविध उपक्रमांसोबत सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान देण्यासाठी आणि नाट्यशास्त्र शिक्षणक्रमाच्या आजी माजी विद्यार्थ्यांना तज्ञ नामांकित कलावंतांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर नाट्यरतन महोत्सवात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील एकूण १२ हिंदी, मराठी व इंग्रजी नाटके सादर केली जाणार आहेत.

पाटील - शिंदे जोडीचं नवं नाटक

लेखक श्री. दत्ता पाटील व दिग्दर्शक श्री. सचिन शिंदे यांची हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, कलगीतुरा, दगड आणि माती, गढीवरच्या पोरी यासह अनेक प्रायोगिक नाटके महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही गाजली आहेत. आता “इथेच टाका तंबू” हे प्रायोगिक नाटक एक वेगळा सामाजिक विषय घेऊन रंगभूमीवर येत आहे. त्यात ओंकार गोवर्धन, अमेय बर्वे, अश्विनी कासार, उमेश जगताप यांच्या भूमिका असून नेपथ्य, पार्श्वसंगीत, रंगमंच व्यवस्था, प्रकाशयोजना यासह निर्मितीच्या विविध तांत्रिक बाजू तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राचे आजीमाजी विद्यार्थी सांभाळत आहेत. नाशिकमध्ये रविवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे या नाटकाचा प्रयोग होईल. नाट्यरतन महोत्सवातील या नाटकाच्या निवडीबाबत विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आनंद व्यक्त केला असून ललित कला केंद्राचे अभिनंदन केले आहे.

विद्यापीठाच्या लौकिकात भर - कुलगुरू

नाट्यविषयक शिक्षणक्रमाला चालना देणारे व विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालणारे हे प्रायोगिक नाटक आहे. ललित कला केंद्राच्या माध्यमातून नाटकासह लोककला, संगीत, नृत्य या क्षेत्रातही भक्कम पाठबळ उभे करून विद्यार्थी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरात या नाटकाच्या प्रयोगांद्वारे विद्यापीठाच्या शैक्षणिक उपक्रमांचा एक प्रकारे प्रसार आणि प्रचार होणार आहे. विद्यापीठाच्या ललित कला केंद्राची ही पहिलीच निर्मिती आहे. लेखक, दिग्दर्शक व कलाकार यांना स्पर्धात्मक रंगभूमीवर जिवंत प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची मोठी संधी मिळणार आहे. कलेच्या औपचारिक शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडून घेण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असे वाटते.

- मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande