नागपूर टाकी दुर्घटना : मृतांचा आकडा 6 झाला
नागपूर, 19 डिसेंबर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील नवीन बुटीबोरी एमआयडीसी परिसरात पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा 6 झाला आहे. तर 9 कामगार जखमी असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी द
नागपूर एमआयडीसीत पाण्याची टाकी फुटून तिघांचा मृत्यू


नागपूर, 19 डिसेंबर (हिं.स.) : नागपूर जिल्ह्यातील नवीन बुटीबोरी एमआयडीसी परिसरात पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा 6 झाला आहे. तर 9 कामगार जखमी असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील अवादा कंपनीच्या प्रकल्पस्थळी उभारण्यात येत असलेली पाण्याची टाकी अचानक कोसळून शुक्रवारी हा अपघात झाला. या दुर्घटनेत अरविंद कुमार ठाकुर, अशोक कंचन पटेल, अजय राजेश्वर पासवान, सुधांशु कुमार नागेश्वर साहनी , बुलेट कुमार इंद्रजित सहा,शमिम अन्सारी या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आवादा कंपनीत सौर पॅनलनिर्मिती आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. याच दरम्यान, बांधकामाधीन पाण्याची टाकी अचानक कोसळली. आणि मोठा आवाज झाला. टॉवर कोसळताच परिसरात धूळ आणि मलब्याचे ढग पसरले, त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अपघातानंतर, पाण्याच्या टाकीच्या बांधकामात वापरलेल्या धातूच्या पत्र्यांच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, पाण्याच्या टाकीची चाचणी सुरू असताना हा अपघात झाला. नागपूर ग्रामीण पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. एमआयडीसी परिसराला नागपूर येथील रामा धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. आवादा प्रकल्पासाठी रामा धरणातून पाणी आणून टाकीत भरण्यात आले होते. हे पाणी बांधकाम कामासाठी आणि प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसाठी वापरले जाणार होते. दरम्यान, आवादा कंपनीच्या आवारातील सर्व पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये पाणी पुन्हा भरले जाईल.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमनदल, तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मलबा हटवण्यात आला. अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढून तत्काळ उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने संपूर्ण परिसर सुरक्षिततेच्या दृष्टीने सिल केला असून, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी याकरीता वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande