चिपळूणमधील तीन महिला रिले आयर्न मॅन
रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : पणजी येथे आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३ या स्पर्धेत चिपळुणातील तीन महिला खेळाडूंनी रिले प्रकारामध्ये भाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात कोकणातील पहिल्या महिला रिले आयर्न मॅन होण्याचा बहुमान पटकावला. आयर्न मॅन ७०.३ स्पर्ध
चिपळूणमधील तीन महिला रिले आयर्न मॅन


रत्नागिरी, 22 डिसेंबर, (हिं. स.) : पणजी येथे आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन ७०.३ या स्पर्धेत चिपळुणातील तीन महिला खेळाडूंनी रिले प्रकारामध्ये भाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात कोकणातील पहिल्या महिला रिले आयर्न मॅन होण्याचा बहुमान पटकावला.

आयर्न मॅन ७०.३ स्पर्धेत पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तीन प्रकारांचा अंतर्भाव होता. रिले प्रकारामध्ये तीन खेळाडू स्वतंत्रपणे यातील प्रत्येक खेळामध्ये भाग घेतात. यामध्ये सर्वप्रथम समुद्रात पोहणे १.९ किमी, त्यानंतर सायकलिंग ९० किलोमीटर, त्यानंतर धावणे २१.१ किलोमीटर असे अंतर एकूण साडेआठ तासांमध्ये पार करावयाचे होते. चिपळूणच्या टीम शक्तीमधील निशा आंबेकर यांनी १.९ किलोमीटर स्विमिंग केवळ ४८ मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर लगेच उन्हामध्ये तसेच अतिशय चढ-उताराच्या रस्त्यावर डॉ. मनीषा वाघमारे यांनी ९० किलोमीटर सायकलिंग ३ तास ५१ मिनिटांत पूर्ण केले. डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी दुपारी १२ वाजता भर उन्हात सुरू करून अत्यंत चढाच्या रस्त्यावर २१.१ किलोमीटर रनिंग २ तास ५२ मिनिटांत पूर्ण केले. एकूण ७ तास ४२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करत टीम शक्तीने कोकणातील पहिल्या महिला रिले आयर्न मॅन होण्याचा बहुमान पटकावला.

आपापले व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक महिने सराव केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब व नागरिकांनी त्यांचा सन्मान केला. पुढील वर्षी वैयक्तिक आयर्न मॅन ७०.३ स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण करण्याचा मानस या तिघींनी बोलून दाखवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande