पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एनए नवीन मालिका सुरू
पिंपरी, 23 डिसेंबर (हिं.स.)।प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी एनए ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी एनए मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाह
पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एनए नवीन मालिका सुरू


पिंपरी, 23 डिसेंबर (हिं.स.)।प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी एनए ही नवीन नोंदणी क्रमांक मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी एनए मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता इच्छुक वाहनमालकांनी विहित नमुन्यात अर्ज करून तीनपट शुल्क भरावे. यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

तसेच दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्याकरिता दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येतील.सदर अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथील नवीन वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह सादर करावेत. डिमांड ड्राफ्ट DY. R.T.O., Pimpri Chinchwad यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेचा असावा. अर्जदाराचा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांसाठी अर्जदारांची यादी दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावासाठी अधिक रकमेचा डीडी सादर करावयाचा असल्यास तो दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास पसंतीचा नोंदणी क्रमांक वितरित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी अर्जदारांची यादी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. लिलावासाठी अधिक रकमेचा डीडी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात सादर करावा. त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिलाव प्रक्रिया पार पडेल.

वाहन क्रमांक आरक्षित झाल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेणे आवश्यक आहे. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. राखीव दिनांकापासून 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी शासनजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी क्रमांकासाठी भरलेली फी परत अथवा समायोजित केली जाणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande