
नांदेड, 23 डिसेंबर (हिं.स.)। यात्रेचे वैभव अधिक वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येत असून, पुढील काळात यात्रेच्या ठिकाणी भौतिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे प्रतिपादन नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
माळेगाव यात्रेनिमित्त पंचायत समिती लोहा यांच्या वतीने वीर नागोजी नाईक मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माजी आमदार मोहन हंबर्डे, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, संजय कराळे, सरपंच प्रतिनिधी हनमंत धुळगंडे, राजेश पावडे, सुरज शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कुस्ती स्पर्धांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आल्याचे सांगीतले. वीर नागोजी नाईक मैदानातून अनेक नामांकित कुस्तीगीर घडले असून या मैदानाची परंपरा गौरवशाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
माळेगावच्या कुस्ती मैदानात लोहा तालुक्यातील रामतीर्थ येथील मल्ल भैय्या पाटील पवार आणि राम तेलंग, शिवनगर, जि. परभणी यांच्यात मानाची कुस्ती खेळविण्यात आली. अनेक डावपेचांनी रंगलेल्या या कुस्तीत भैय्या पवार यांनी विजय मिळवला. त्यास ५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
भैय्या पवार यांनी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये तीन वर्षे दादू मामा चौगुले यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले आहेत. त्यांनी परभणी, लातूर, कोल्हापूर, कुरूडवाडी आदी ठिकाणी कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. दररोज व्यायाम, आठसे सूर्यनमस्कार व दीडसे दंड बैठकांचा सराव तसेच बदाम, तूप व फळांचा आहार घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis