
नवी दिल्ली , 28 डिसेंबर (हिं.स.)।आज काँग्रेस पक्षाचा 140 वा स्थापना दिवस साजरा होत आहे. या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंदिरा भवन येथे राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि काँग्रेसच्या 140 वर्षांच्या इतिहास व योगदानाची आठवण करून दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या तसेच पक्षाच्या इतिहास आणि आदर्शांवर प्रकाश टाकला.
इंदिरा भवन येथे आयोजित ध्वजारोहण समारंभात संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. पक्षाध्यक्ष खरगे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या योगदानावर विशेष भर दिला. ते म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नेहमीच देशवासीयांच्या कल्याण, सक्षमीकरण आणि समावेशक विकासासाठी कार्य केले आहे. खरगे यांनी सांगितले की, 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यांनी पुढे नमूद केले की, गेल्या 62 वर्षांमध्ये कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशासाठी संघर्ष केला, तुरुंगवास भोगला आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले.
या प्रसंगी मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस पक्षाच्या संस्थापकांना आणि स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानींना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेस पक्ष आपल्या संस्थापकांनी ज्या भारताची कल्पना केली होती, त्या भारतासाठी सातत्याने कार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खरगे म्हणाले की, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली गरीब, शेतकरी आणि सामान्य जनता सातत्याने संघर्ष करत राहिली. आज मात्र संविधान आणि लोकशाहीवर संकटाचे सावट आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाची एकता, अखंडता आणि धर्मनिरपेक्षतेसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली.
दिल्लीमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि यूपीए सरकारने जनतेच्या अधिकारांचे संरक्षण अधिक मजबूत केले. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना माहितीचा अधिकार , शिक्षणाचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, वनहक्क कायदा आणि भूमी अधिग्रहण कायदा असे अनेक महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आले, असेही खरगे यांनी सांगितले.
यावेळी खरगे यांनी आरोप केला की, गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने काँग्रेसने उभारलेल्या संस्थांना कमकुवत केले आहे. त्यांनी असेही म्हटले की, आरएसएस-भाजपाचे नेते राष्ट्रीय ध्वज, संविधान, अशोकचक्र आणि ‘वंदे मातरम्’चा अवमान करत आहेत. सध्याचे सरकार लोकांचे अधिकार दडपून टाकत असून स्वातंत्र्यलढ्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही, तसेच आज जनतेचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे झाली होती. त्या वेळी 72 प्रतिनिधींच्या उपस्थितीत दादाभाई तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली. ए. ओ. ह्यूम हे पक्षाचे संस्थापक महासचिव होते, तर व्योमेश चंद्र बॅनर्जी यांची पहिल्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस पक्षाने आपल्या आदर्शांवर आणि देशभक्तीच्या संदेशावर पुन्हा एकदा भर देत सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode