
मुंबई, 29 डिसेंबर (हिं.स.)।सध्या मुंबई आणि उपनगरासह संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत महापालिका निवडणुका होणार असून १६ जानेवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येणार हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा शर्थीचे प्रयत्न करत आहे. भाजपाकडून काही उमेदवारांना मुंबई महापालिका निवडणुकीचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकरलाही भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
निशा परुळेकरने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक २५ साठी निशाला भाजपाने उमेदवारी दिली आहे. निशा परुळेकरच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे योगेश भोईर-माधुरी भोईर उमेदवार आहेत. गेल्या काही काळापासून निशा राजकारणात सक्रिय असून सध्या ती भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहे.
निशा परुळेकर हे मराठी कलाविश्वातील मोठं नाव आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 'काळुबाई पावली नवसाला', 'अशी होती संत सखू', 'सासूच्या घरात जावयाची वरात', 'पोलीस लाईन', 'हरी ओम विठ्ठला', 'तीन बायका फजिती ऐका' हे तिचे गाजलेले सिनेमे. 'सही रे सही' या नाटकात तिने भरत जाधव यांच्यासोबतही काम केलं होतं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode