करंजाडे क्रीडामय; हॉलिबॉल स्पर्धेत आठ संघांची रोमांचक लढत
रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। करंजाडे येथे छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हॉलिबॉल स्पर्धांनी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण केले. करंजाडे व परिसरातील तरुणांना खेळाकडे आकर्षित करणे, त्यांच्यात शिस्त, राष्ट्रभावना आणि आरोग्य
करंजाडे क्रीडामय; हॉलिबॉल स्पर्धेत आठ संघांची रोमांचक लढत


रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। करंजाडे येथे छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हॉलिबॉल स्पर्धांनी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण केले. करंजाडे व परिसरातील तरुणांना खेळाकडे आकर्षित करणे, त्यांच्यात शिस्त, राष्ट्रभावना आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजक प्रथमेश भास्कर पुंडे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्रथमेश पुंडे म्हणाले की, “जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांमधील भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. यामागे तळागाळातून खेळाडू घडविण्याची कमतरता आहे. करंजाडे शहरातूनही दर्जेदार खेळाडू घडावेत, यासाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करणे हे माझे दायित्व आहे.” भविष्यात अशा अनेक क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेमागे स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनमूल्यांचा आणि राष्ट्रवादाच्या विचारांचा प्रचार करणे, तरुणांमधील सुप्त गुणांना वाव देणे, तसेच निरोगी व शिस्तबद्ध समाजनिर्मितीसाठी क्रीडासंस्कृतीला चालना देणे हा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या हॉलिबॉल स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये करंजाडे येथील सात संघ आणि वांद्रे, मुंबई येथील एका संघाचा समावेश होता. स्पर्धेदरम्यान सर्व संघांनी उत्कंठावर्धक आणि रोमांचक खेळाचे प्रदर्शन केले. प्रारंभी सामने खेळणाऱ्या संघांनीच अंतिम फेरी गाठत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.

छत्रपती स्पोर्ट्स क्लब १ आणि हॉलिडे पँथर्स यांच्यात झालेला अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर सहभागी संघांनाही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रविण बनकर यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व खेळाडूंचे आणि संघांचे अभिनंदन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande