छ संभाजीनगर - रिचा बागला यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। ऋ-महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सच
छ संभाजीनगर - रिचा बागला यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा आढावा


छत्रपती संभाजीनगर, 30 डिसेंबर (हिं.स.)। ऋ-महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला यांनी आज ऑनलाईन बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

या बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, नगर विकास विभागाचे सह आयुक्त आश्विनकुमार माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

औंढा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, भक्त निवास, स्वच्छता, सौंदर्यीकरण, परिसर विकास व पर्यावरणपूरक विकास यांचा समावेश असलेल्या 221 कोटी 62 लाख रुपयांच्या विकास आराखड्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, तसेच धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन दृष्टिकोनातून या तीर्थक्षेत्राचा समतोल व नियोजनबद्ध विकास करून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे आकर्षण ठरावे, अशा सूचना पालक सचिव रिचा बागला यांनी दिल्या.

तयार करण्यात आलेला विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यासाठी आवश्यक परवानगी घ्यावी. तसेच आराखडा अंतिम करण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात पुन्हा ऑनलाईन बैठक आयोजित करावी, असे निर्देशही पालक सचिव श्रीमती बागला यांनी दिले.

दरम्यान, श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेल्या 221 कोटी 62 लाख रुपयांच्या विकास आराखड्याची तसेच भाविक व पर्यटकांना आदर्श सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande