पुणे, 4 फेब्रुवारी (हिं.स.)।एपीएससीकडून २ फेब्रुवारी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, असे सांगत ४० लाखांची मागणी करणारी ध्वनिफीत नुकताच प्रसारित झाली होती. ही ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी याची गंभीरपणे दखल घेत तपासही सुरु केला. मात्र, आता या प्रकरणाचे तार थेट मध्यप्रदेशपर्यंत असल्याचं पुढे आलं आहे.याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मध्य प्रदेशच्या बालाघाटमधून एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. दीपक यशवंत साकरे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. यापूर्वी पोलिसांना तिघांना अटक केली होती. साकरेच्या अटकेनंतर आता या प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. यातील मुख्य सुत्रधार एक महिला अधिकारी असल्याचे बोलले जात असताना मध्यप्रदेशमधून एकाला अटक केल्यानंतर हे रॅकेट परराज्यातून चालविले जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु