पुणे, 14 मार्च (हिं.स.)।
मुंढवा परिसरात पोलिसांनी छापा टाकून सुमारे १७ लाख रुपयांचा २८ किलो गांजा जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अमली पदार्थ विरोधी पथक- दोनचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पोलिस अंमलदार आझाद पाटील यांना मुंढवा कोरेगांव पार्क रस्त्यावरील एका मोकळ्या प्लॉटमध्ये गांजा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकातील पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
प्रमोद सुधाकर कांबळे (वय-४४, रा. किल्ला वेस, करमाळा, सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय-४१, रा. मोहननगर, विश्रांतवाडी, पुणे) यांच्या ताब्यातून १६ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला. या दोघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु