बीड, 12 मार्च (हिं.स.)।बीडमधील गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याला अखेर प्रयागराज येथे पोलीसांनी अटक केली आहे.शिरुरमध्ये एका व्यक्तीला मारहाणीच्या घटनांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सतत ठिकाणं बदलत होता. अखेर, गुप्त माहितीच्या आधारे बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.याबाबत माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
बीडच्या शिरुरमध्ये काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेने एका तरुणाला केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर सतीश भोसले हा फरार होता. बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.अखेर 6 दिवसांनंतर तो सापडला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीड पोलिसांनी प्रयागराज या ठिकाणाहून अटक केली आहे. त्यानुसार आता प्रयागराज पोलीस सतीश भोसले याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करतील.त्याला आज किंवा उद्या बीडला आणले जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.
खोक्या ऊर्फ सतीश भोसलेवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसलेने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. याशिवाय सतीश भोसले याने शिरूरमध्ये बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यानंतर खोक्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. अखेर त्याला प्रयागराजमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode