रत्नागिरी : सायकल फेरी आणि बीच कबड्डी स्पर्धा उत्साहात
रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे फिटनेस का डोस, अर्धा तास रोज या थीमनुसार भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्या
रत्नागिरी : सायकल फेरी आणि बीच कबड्डी स्पर्धा उत्साहात


रत्नागिरी, 13 मार्च, (हिं. स.) : भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार फिट इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे फिटनेस का डोस, अर्धा तास रोज या थीमनुसार भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीचे उद्घाटन निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले. तंदुरुस्त राहण्याकरिता दररोज किमान अर्धा तास सायकल चालविणे आवश्यक असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.

या फेरीमध्ये १५० सायकलस्वारांचा सहभाग होता. सहभागी सायकलस्वारांसाठी टी-शर्ट, अल्पोपहार व पाण्याची सोय करण्यात आली होती.

फिट इंडिया कोस्टल गेम्स २०२५ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हास्तरीय बीच कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते भाट्ये बीच येथे झाले. स्पर्धेत एकूण खुला गट (मुले) १८ संघ व महिला २ संघ सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेले खेळाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेतील सर्व खेळाडूंकरिता निवास, भोजन व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती.

संगमेश्वर तालुक्यातील हिंदवी देवरूख व सोळजाई देवरूख या दोन मातब्बर संघांमध्ये अंतिम लढत झाली. त्या लढतीत सोळजाई संघाने हिंदवी संघावर सहा गुणांनी मात करीत पहिल्या जिल्हास्तरीय बीच कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. करंडादेवी-लांजा संघ तृतीय विजेता तर न्यू हिंद विजय-चिपळूण संघ चतुर्थ विजेता ठरला. प्रथम विजेत्याला २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्याला १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय व चतुर्थ विजेत्याला ५ हजार रुपये प्रत्येकी व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी खेळाडूंना शासकीय सेवेतील संधीबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande