मुंबई, 13 मार्च (हिं.स.)।सध्या छोट्या पडद्यावर एकामागोमाग एक नवीन मालिका सुरू होत आहेत. वाहिन्यांकडून देखील अगदी कमी कालावधीसाठी मालिका चालू ठेवण्याचा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या 1 ते 2 वर्षात जुन्या मालिका बंद करून त्या जागी नवीन मालिका सुरू केल्या जात आहेत.आता झी मराठीवरील दोन लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. याशिवाय, इतर मालिकांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी सुरू झालेली झी मराठीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे या कलाकारांची प्रमुख भूमिका होती. सुरुवातीला मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र, नंतर मालिका टीआरपीमध्ये मागे पडल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 'पुन्हा कर्तव्य आहे' सोबतच 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेता रोहित परशुरामने इंस्टाग्रामवर पोस्ट याबाबतची माहिती दिली होती. या दोन्ही मालिकेची वेळ देखील बदलण्यात आली होती. मात्र, आता झी मराठीने या मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
झी मराठीने नवीन मालिकेची देखील घोषणा केली आहे. लवकरच 'चल भावा सिटीत' हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शो मध्ये अभिनेता श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे. हा शो प्रेक्षकांना रात्री 9.30 वाजता पाहायला मिळेल. याशिवाय, 'लाखात एक आमचा दादा', 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या तीन मालिकांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode