नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.)। हिंगोली जिल्ह्यातील वसमतचे अभियंते योगेश पांचाळ यांना गतवर्षी डिसेंबरमध्ये इराणमध्ये बेकायदेशीपणे ताब्यात घेण्याच्या प्रकरणी भारताने इराणकडे तीव्र निषेध नोंदवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत दिली. खा. अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
वैध पद्धतीने विदेशात प्रवास करीत असलेल्या भारतीय नागरिकांना तेथील शासकीय यंत्रणांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याच्या काही घटना मध्यंतरी घडल्या होत्या. त्याबाबत गुरुवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. वसमतचे अभियंते योगेश पांचाळ यांच्या बेकायदेशीर अटकेचा संदर्भ देताना ते म्हणाले की, इराणमध्ये त्यांना का ताब्यात घेतले, याविषयी तेथील यंत्रणेने कोणतीही माहिती दिली नाही. त्यांचा नेमका ठावाठिकाणी सांगितला नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी भारतात त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. केंद्र सरकारच्या पुढाकाराने त्यांची सुटका झाली. परंतु, भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित कुटुंबाला माहिती मिळावी आणि त्या व्यक्तीची लवकरात लवकर सुटका होईल, याअनुषंगाने यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. याबाबत उत्तर देताना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी विदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला संबंधित देशातील भारतीय दूतावासांचे पहिले प्राधान्य असल्याचे सांगितले. योगेश पांचाळ यांच्या सुटकेसाठी इराणमधील भारतीय दूतावास आणि राजदूतांनी महत्वाची भूमिका बजावल्याचेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर