मॉस्को, 30 मार्च (हिं.स.)। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील लिमोझिन कारमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. रशियन संरक्षण संस्था असलेल्या एफएसबीच्य मुख्यालयाजवळ हा स्फोट झाला आहे.या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही दुर्घटना आहे की घातपात, याचा तपास केला जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मॉस्कोमधील 'एफएसबी' गुप्तचर विभागाच्या मुख्यालयाच्या उत्तरेस पुतिन यांच्या ताफ्यातील एका लिमोझिन कारमध्ये अचानक स्फोट झाला. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजनुसार आग प्रथम कारच्या इंजिनमध्ये लागली आणि नंतर ती आतील भागात पसरली. गाडीला आग लागताच, जवळच्या रेस्टॉरंट्स आणि बारमधील कर्मचारी मदतीला धावले. दरम्यान, या कारमध्ये कोण होतं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ही लिमोझिन कार व्लादिमीर पुतिन यांच्या प्रेसिडेंशियल प्रॉपर्टी मॅनेजमेंट डिपार्टमेंटमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही
दरम्यान, दुसरीकडे युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या बेलगोरोड क्षेत्रात मोठा हल्ला केला आहे. त्यामुळे रशियाच्या गोटात खळबळ उडाली आहे. बेलगोरोडचे गव्हर्नर व्याचेस्लाव्ह ग्लेडकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या सैन्याने या हल्ल्याचं वृत्त नाकारलं आहे. गतवर्षी युक्रेनने रशियाच्या कुर्स्क परिसरातील एक हजार चौरस किलोमीटर परिसरावर कब्जा केला होता. मात्र आता रशियाने हा भाग पुन्हा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांना उत्तर कोरियाच्या सैनिकांकडून मदत होत असल्याचा दावा केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode