ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे 'पर्यावरण स्नेही’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजर
Makarand


मुंबई, 30 मार्च (हिं.स.)। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. यंदाचं हे १८ वर्ष असून ९०च्या दशकातील ज्येष्ठ कलाकारांनी 'चिरायू' ची मुहूर्तमेढ रोवली होती. कालांतराने खंडित झालेल्या या परंपरेला पुन्हा एकदा झळाळी आणली ती म्हणजे लोकप्रिय कलाकार सुशांत अरुण शेलार यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २००६ पासून 'शेलार मामा फाउंडेशन'द्वारा आयोजित 'चिरायू' या यशस्वी उपक्रमाला प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांची देखील मोलाची साथ लाभली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या पूर्वसंध्येला हा नवोन्मेष सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री. आशिष शेलार साहेब आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.

मराठी कलाक्षेत्र हे जितके प्रयोगशील, तितकेच समाजाभिमुख राहिले आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच 'चिरायू' ची मोट बांधली गेली, हेच उद्दिष्ट्य उराशी बाळगून 'शेलार मामा फाउंडेशन'ने या वर्षी पहिल्यांदाच सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार केला. 'नाम फाउंडेशन' द्वारा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे प्रसिद्ध अभिनेते *'श्री. मकरंद अनासपुरे'* यांना यंदाचा 'पर्यावरण स्नेही' हा पुरस्कार मा. श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. शिवाय दरवर्षीप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जिओ हॉटस्टारचे हेड *‘श्री. गौरव गोखले,* कार रेसिंग क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करणारी लोकप्रिय अभिनेत्री *कु. मनीषा केळकर'*, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गणल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण करणाऱ्या *'श्री. गणेश आचवल'* आणि पडद्यामागील कलावंत विभागात केशभूषेसाठी *'सौ. अमिता कदम',* आर्ट स्पॉट करीता *'श्री. मारुती मगदूम'*, स्पॉट दादा - *'श्री. दशरथ सावंत'* आदी कलाकार-तंत्रज्ञांना 'चिरायू' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मकरंद अनासपुरे यांनी यावेळी, ''हा सन्मान केवळ माझा नाही संपूर्ण 'नाम फाऊंडेशन' आणि आमच्या प्रयत्नांना दिलेली महाराष्ट्र शासनाची साथ अशा साऱ्यांचा असून मी हा पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात स्विकारत आहे. गुढीपाडव्याला कुठलीही चांगली गोष्ट जर घडली तर ती वृद्धिंगत होते हा माझा अनुभव आहे. नाम फाऊंडेशनमार्फत असंख्य दुर्लक्षित प्रश्न समाजासमोर / शासनासमोर आणण्यासाठी 'चिरायू' संसथेने दिलेला हा पुरस्कार नक्कीच आमचं बळ वाढवणारा आहे.'' असं आपलं मनोगत व्यक्त करत मा. श्री. आशिष शेलार (महाराष्ट्र राज्य, सांस्कृतिक कार्यमंत्री) आणि सुशांत शेलार (शेलार मामा फाऊंडेशन) यांचे आभार व्यक्त केले.

उपस्थित कलाकार आणि मान्यवरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत, मा. श्री. आशिष शेलारांनी, ''सांस्कृतिक कार्यमंत्री पदभार घेतल्यापासून हा पहिलाच सन्मान सोहळा आहे ज्यात पडद्यामागील कलाकारांना गौरवण्याकरिता मला आमंत्रित करण्यात आलं आहे आणि याचा मला फार आनंद आहे. कला आणि समाजसेवेचा घातलेला हा अनोखा मेळ खरोखरीच स्तुत्य असून सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या माझ्या मित्रवर्य सुशांत शेलार आणि अक्षय बर्दापूरकर यांचे आभार मानतो. 'चिरायू' सोहळा पिढ्यानपिढ्या घडत राहो यासाठी लागेल ती मदत शासन नक्की करेल. असं आपलं मनोगत व्यक्त केलं.

या मंगल प्रसंगी 'शेलार मामा फाउंडेशन'चे सुशांत शेलार यांनी जमलेल्या साऱ्या मान्यवर आणि कलाकार - तंत्रज्ञांचे आभार मानत, दरवर्षी 'चिरायू'च्या निमित्ताने ज्यांच्या जिद्द आणि परिश्रमाची कधीही दखल घेतली जात नाही अशा पडद्यामागच्या व्यक्तींचा सन्मान आपण करतो पण यावर्षीच्या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, प्रामुख्याने पर्यावरण जतन, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकाराला 'पर्यावरण स्नेही' हा पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आला. कला आणि समाजसेवेला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा हा प्रांजळ हेतू होता.'' अशा समर्पक शब्दांत ‘शेलार मामा फाउंडेशन’चा मूळ उद्देश मांडला.

'चिरायू २०२५' सोहळ्यास मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर, मकरंद अनासपुरे, गायक अवधूत गुप्ते, अभिनेते संतोष जुवेकर, अरुण कदम, कौस्तुभ दिवाण, अभिनेत्री मनीषा केळकर, पल्लवी वैद्य, धनश्री कांडगावकर, मीरा जोशी, परी तेलंग, दिशा परदेशी, प्राची पिसाट या आणि अशा असंख्य कलाकारांनी उपस्थिती लावत मराठमोळ्या हिंदूनववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande