डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान समाजसुधारक,विधिवेत्ता, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते.त्यांनी आपल्या विचारांद्वारे व कृतीद्वारे भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले.विशेषतः समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा अभ्यास केल्यास त्यांच्या बहुआयामी कार्याची जाणीव होते.खाली त्यांच्या विविध क्षेत्रातील विचारांचा थोडक्यात आढावा घेऊया.
सामाजिक सुधारणा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणेवर गाढ विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता, जातिव्यवस्था आणि सामाजिक भेदाभेद यांचा तीव्र विरोध केला. मनू स्मृती सारख्या ग्रंथांची त्यांनी जाहीर होळी केली आणि जातिभेद निर्मूलन हे आपल्या संघर्षाचे केंद्रबिंदू मानले. त्यांच्या मते, खऱ्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे तर सामाजिक समता आहे. त्यांनी ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ सारख्या वृत्तपत्रांद्वारे समाजजागृती केली. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून सामाजिक समतेचा आणि आत्मगौरवाचा नवा मार्ग समाजासमोर मांडला.
आर्थिक विचार
डॉ. आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते तर एक अत्यंत प्रतिभावान अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएच.डी.पूर्ण केली होती.त्यांच्या मते,कोणत्याही राष्ट्राची खरी उन्नती आर्थिक विकासावर अवलंबून असते. त्यांनी 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'च्या स्थापनेबाबत महत्वपूर्ण भूमिका बजावली. प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या ग्रंथात भारताच्या चलन व्यवस्थेचा सखोल अभ्यास त्यांनी मांडला. त्यांनी ग्रामीण व शेतकरी अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी राष्ट्रीय आर्थिक योजना, शेतमालाच्या किमान हमी भावाची संकल्पना, शेतीवर आधारित उद्योग उभारणी यावर भर दिला.
कृषीविषयक विचार
डॉ. आंबेडकर यांचे कृषी क्षेत्रावरील विचार अतिशय आधुनिक होते. त्यांच्या मते,भारताचे भवितव्य हे कृषी क्षेत्राच्या उन्नतीवर अवलंबून आहे.त्यांनी भूसुधारणा,शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन व्यवस्था आणि सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.त्यांच्या मते,जमीन ही शेतकऱ्याच्या मालकीची असावी आणि शेतकऱ्याच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा. त्यांनी शेतीमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर आणि कृषीशिक्षणाला महत्त्व दिले.
शैक्षणिक विचार
शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे बाबासाहेबांचे ठाम मत होते.शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र होता. त्यांच्या मते, शिक्षणामुळेच व्यक्तीचे व्यक्तिमत्व विकसित होते आणि समाजात समानतेची भावना निर्माण होते.त्यांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आणि सरकारकडून शिष्यवृत्ती, वसतिगृहे यांसाठी प्रयत्न केले. शिक्षण हा माझा श्वास आहे, असे त्यांचे वाक्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी स्त्री शिक्षणावरही भर दिला.
आरोग्यविषयक विचार
बाबासाहेबांनी आरोग्यविषयक समस्यांकडे गांभीर्याने पाहिले. त्यांच्या मते, आरोग्य ही मूलभूत गरज असून त्यावर सरकारने भर द्यायला हवा. स्वच्छता,आरोग्य सेवा,पोषण आहार आणि औषधोपचार यांचा सर्वसामान्यांना सहज आणि मोफत लाभ मिळायला हवा.त्यांनी ‘मुंबई नगरपालिके’मध्ये काम करताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. त्यांचा भर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर होता.
जलसंवर्धन व पाणी व्यवस्थापन
पाण्याचा योग्य वापर, साठवण आणि व्यवस्थापन यावरही बाबासाहेबांनी भर दिला.त्यांनी धरणे, कालवे व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे महत्त्व ओळखले.‘दामोदर खोरे विकास योजना’ सारख्या प्रकल्पांना त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या मते, पाणी हे केवळ शेतीसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांच्या जीवनमानासाठी आवश्यक आहे. त्यांनी ग्रामीण भागात स्वच्छ पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी धोरणात्मक विचार मांडले.
पत्रकारितेतील योगदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रभावी लेखक आणि संपादक होते. त्यांनी ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’, ‘जनता’,‘प्रबुद्ध भारत’ यांसारखी वृत्तपत्रे आणि मासिके सुरु करून समाजाच्या विचारप्रवाहाला दिशा दिली. त्यांनी या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, विषमता, शोषण यांचा समाचार घेतला आणि शोषित घटकांना आत्मभान दिले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय चळवळ चालवली. पत्रकारिता ही त्यांच्यासाठी प्रचाराचे माध्यम नव्हे, तर परिवर्तनाचे शस्त्र होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्यविषयक आणि पत्रकारितेतील विचारांनी आजही देशाला दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने आखलेले विचार भारताच्या विकास प्रक्रियेत मार्गदर्शक ठरत आहेत.त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आणि कार्य हे प्रत्येक भारतीयाने आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे.
विवेक खडसे
जिल्हा माहिती अधिकारी.
धाराशिव.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने