रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : घराजवळच तीव्र उतारावर ट्रॅक्टर उलटल्याने त्याच ट्रॅक्टरखाली चिरडून चालक जागीच ठार झाला. आज सकाळी हा अपघात झाला. प्रमोद पांडुरंग मांजरेकर (५१) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. प्रमोद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ असा परिवार आहे.
प्रमोद यांचे घर वरचीपेठ येथे आहे. त्यांच्या घरासमोरच ही दुर्दैवी घटना घडली. आज सकाळी नेहमीपमाणे त्यांनी आपला ट्रॅक्टर व्यवसायासाठी बाहेर काढला. त्यांच्या घराला लागून तीव्र उताराचा रस्ता असून या उतारावर त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. त्यामध्ये चालक ट्रॅक्टरच्या पुढच्या भागाखाली आला आणि चिरडला गेला. मांजरेकर कुटुंबीय आणि शेजारी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उपस्थित तरुणांनी प्रमोद यांच्या अंगावरील ट्रॅक्टर उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. अखेर जेसीबी आणून ट्रॅक्टर बाजूला करून प्रमोद यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी