रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : आगामी पावसाळ्यात अतिवृष्टीने नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना व खबरदारीच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती कृती आराखडे बनविण्याच्या सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा राजापूर उपविभागीय अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी राजापूर लांजा तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मौलिक मार्गदर्शन केले.
राजापूर उपविभागातील राजापूर व लांजा तालुक्यांतील संभाव्य पाणीटंचाई व आगामी पावसाळी हंगामातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने दोन्ही तालुक्यांतील तहसीलदार व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयात झाली. यावेळी त्यांनी राजापूर शहरातील अर्जुना नदीपात्रातील काढण्यात आलेला गाळ पावसाळयापुर्वी नदीपात्राबाहेर हलविण्यात यावा तसेच वरचीपेठ येथील नव्या पुलाखालील नदीपात्रात टाकण्यात आलेला गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती डॉ. जॅसमिन यांनी दिली.
बैठकीला राजापूर तहसीलदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी नीलेश जगताप, विविध खात्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभागांना पावसाळयात सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. नगर परिषद, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी संयुक्त आढावा बैठका घेण्याच्या सूचना डॉ. जॅसमिन यांनी केल्या.
राजापूर शहराला पावसाळ्यात भेडसावणाऱ्या पूर समस्येबाबत व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी निवेदन केले. त्याअनुषंगाने नदीपात्रातील गाळ नदीपात्राबाहेर नेण्याबाबत तसेच नवीन पुलाखालील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्याबाबतच्या सूचना डॉ. जॅसमिन यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी