सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपचे आयोजन
सिंधुदुर्गात पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा
सिंधुदुर्ग, 25 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने येत्या १० ते १३ मे या कालावधीत कुडाळ येथे कोकणरत्न बॅडमिंटन टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे ११, १३ आणि १५ या वयोगटातील स्पर्धकांसाठी हि स्पर्धा असून कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यलयांच्या बॅडमिंटन हॉल मध्ये रोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत कोकण विभागातून सुमारे ३०० स्पर्धक सहभागी होतील अशी माहिती सिंधुदुर्ग बॅडमिंटन ग्रुपचे डॉ. अमोघ चुंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारची सिंधुदुर्गमध्ये होणारी हि पहिलीच स्पर्धा असल्याचेही डॉ. चुबे यांनी सांगितले.
येथील हॉटेल लाईम लाईट मध्ये सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने या बॅडमिंटन स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी डॉ. अमोघ चुबे यांच्यासह ऍड. सुहास सावंत, योगेश नाडकर्णी, समीर साखळकर, जयेश धुरी, किरण सावंत, प्रथमेश सावंत उपस्थित होते.
माहिती देताना डॉ. चुबे यांनी सांगितले कि, कोकणातील मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी हि स्पर्धा आहे. ११ वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यासाठी एकेरी, १३ वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यासाठी एकेरी आणि १५ वर्षाखालील मुले आणि मुली यांच्यासाठी एकेरी व दुहेरी अशा गटात हि स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची या स्पर्धेला मान्यता आहे. खेळाडू महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनला रजिस्टर असणे बंधनकारक आहे. खेळाडूंनी आपली नावे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या ऑफिशियल साईट वर नोंदवणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी एकेरीसाठी एक हजार आणि दुहेरी साठी २ हजार प्रवेश फी राहील. या स्पर्धेच्या विजेत्यांसाठी आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके असणार आहेत.
कोकणातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे, युवा पिढीला शारीरिक व मानसिकदृष्टया सुदृढ व सक्षम बनविणे, खेळाकडे आकर्षित करणे हा हा स्पर्धेमागचा उद्देश आहे.कोकणातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे ३०० खेळाडू, त्यांचे पालक या स्पर्धेच्या निमित्ताने कुडाळ मध्ये येणार आहेत. त्यामुळे पर्यटन वाढीसाठीसुद्धा या स्पर्धेचा फायदा होणार असल्याचे डॉ. चुबे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी जयेश धुरी (मोबा. क्र. ९८९२१९०९०९), किरण सावंत (८७६६४४३६७९) किंवा समीर साखळकर (९८८१८८३८८४) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग बॅडमिंटन गृपच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी