श्रीनगर, 26 एप्रिल (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 26 हिंदुंच्या टार्गेट किलींगनंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी लश्कर-ए-तैयबाच्या 7 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. पहलगाम हल्ल्यात लश्करचा हात असून दहशतवादी हाफिज सईद या हल्ल्याचा मास्टर माईंड आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियान, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.
शोपियानमधील छोटीपोरा गावात लष्कर कमांडर शाहिद अहमद कुट्टे यांचे घर जमिनदोस्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुट्टे गेल्या 4 ते 5 वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांचा तो समन्वयक होता. त्याचवेळी, कुलगामच्या मतलाम भागात सक्रिय दहशतवादी जाहिद अहमदचे घरही पाडण्यात आले. त्याचप्रमाणे पुलवामा येथील मुर्रन भागात दहशतवादी अहसान उल हकचे घर उडवून देण्यात आले. अहसानने 2018 मध्ये पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते आणि अलीकडेच तो खोऱ्यात पुन्हा दिसला होता. याशिवाय, जून 2023 पासून सक्रिय असलेला लश्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी अहसान अहमद शेख याचे दुमजली घरही पाडण्यात आले. हरिस अहमद यांचे घरही उडवून देण्यात आले आहे. शेख 2023 पासून दहशतवादात सहभागी आहे. त्याचे पुलवामामधील काचीपोरा येथील घर उडवून देण्यात आले.यापूर्वी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल हुसेन आणि आसिफ शेख यांची घरेही स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली होत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात स्फोटकेही ठेवण्यात आली होती. यासोबतच अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहे. तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.पहलगाम दहशतवादी घटनेनंतर, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी