पुणे, 26 एप्रिल (हिं.स.)।
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला, यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या हल्यानंतर भारताने मोठं पाऊल उचलत काही महत्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले, तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
या बरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश देत ज्या त्या राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की जे लोक व्हिसा घेऊन पाकिस्तानमधून आले आहेत. त्यांना नोटीसा दिल्या असून ते पुन्हा जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. तसेच पाकिस्तान ज्या पाण्यावर निर्भर आहे, ते पाणी जर भारताने आडवणं सुरु केलं तर पाकिस्तानवर अक्षरश: तहानेने मरण्याची वेळ येईल’, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु