नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.)।प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर एका गाण्याची कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने संगीतकार रहमान यांना कॉपीराईटसाठी 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तथापि, रहमान यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
दाक्षिणात्य कलावंतांचा भरणा असलेल्या पोन्नियिन सेल्वन 2 या चित्रपटातील गाण्याविषय़ीचे हे प्रकरण आहे. या चित्रपटात विक्रम, कार्ति, शशोभिता धुलिपला, ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट मणीरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील 'वीरा राजा वीरा' हे गाणे हूबेहुब दिवंगत ज्युनियर डागर बंधुंनी रचलेल्या 'शिव स्तुती' सारखेच असल्याचे आढळल्यानंतर, न्यायालयाने अंतरिम आदेशात रहमान यांना दोन कोटी रूपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, ए. आर. रहमान यांनी कॉपीराईटचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. शिवाय, मद्रास टॉकीजच्या टीमनेही हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी म्हटले की, या चित्रपटातील कथित वादग्रस्त गाणे केवळ 'शिव स्तुती'वर आधारित किंवा प्रेरित नसून प्रत्यक्षात केवळ बोलांमध्ये बदल केले आहेत.उर्वरित गाण्याची रचना हूबेहूब आहे. इतर घटक जोडल्याने कथित वादग्रस्त गाणे आधुनिक रचनेसारखे बनले असेल. मात्र, मूळ संगीत हुबेहुब आहे, असे न्यायालयाने म्हटले. रहमान यांचे गाणे स्वर (सुर), भावना (भाव) आणि श्राव्य परिणाम (कानावर पडणारा प्रभाव) या सर्व दृष्टीकोनांनी 'शिव स्तुती' या मूळ रचनेसारखंच आहे. अगदी एका सामान्य श्रोत्याच्या दृष्टीनेही असे न्यायालयाने म्हटले आहे.
मूळ गाणे संगीतकार उस्ताद नासिर फैयाजुद्दीन डागर आणि उस्ताद नासिर जहिरुद्दीन डागर यांचे आहे. त्यांचे वारसदार उस्ताद फैयाज वसिफुद्दीन डागर यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या उत्तरात हा आदेश देण्यात आला.सर्व ओटीटी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, गाण्याच्या क्रेडिटमध्ये स्पष्टपणे दिवंगत उस्ताद एन. फैयाजुद्दीन डागर आणि दिवंगत उस्ताद जहिरुद्दीन डागर यांनी लिहिलेल्या शिवस्तुतीवर आधारित रचना असे नमूद करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode