
संरक्षण उद्योगासाठी नाशिकला अनुकूल वातावरण
नाशिक, १६ मार्च (हिं.स.) : केंद्रीय संरक्षण सचिव राजेशकुमार सिंग यांनी नाशिकमध्ये संरक्षणविषयक साहित्य व उपकरणांच्या उत्पादनासाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे सांगितले. त्यामुळे येथे ‘डिफेन्स इंडस्ट्रियल क्लस्टर’ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी आश्वासन दिले.
सिंग यांच्या नाशिक दौऱ्यावर नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (NIMA) च्या शिष्टमंडळाने अध्यक्ष आशिष नहार यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या विमान निर्मिती विभागामुळे नाशिक देशातील महत्त्वाच्या संरक्षण उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या विभागाने ‘एसयू-३० एमकेआय’ विमानांच्या परवानाकृत उत्पादनापासून पूर्ण क्षमतेच्या स्वदेशी उत्पादनापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते HAL येथे ‘एलसीए- तेजस एमके १ अ’ साठी तिसऱ्या उत्पादन वाहिनी आणि HTT-40 मूलभूत प्रशिक्षण विमानासाठी दुसऱ्या अंतिम जोडणी वाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. या विस्तारामुळे देशाच्या संरक्षण गरजांसाठी लढाऊ विमाने आणि स्वदेशी प्रशिक्षण विमानांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल.
शिष्टमंडळाने संरक्षण क्लस्टर स्थापन करण्यासाठी निर्णय घेण्याची विनंती केली. भेटीत उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV