नवी दिल्ली, 27 एप्रिल (हिं.स.) - डिजिटल इंडिया मिशनला पुढे नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) ने 25 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतन येथे आठ दूरदर्शी संस्थांसोबत सामंजस्य करार (MoU) केले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याच्या कार्यक्रमात, देशाच्या डिजिटल परिसंस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने एनआयईएलआयटी साठी हा धोरणात्मक सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.
एनआयईएलआयटी ने ज्या संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे त्यात सेमी-कंडक्टर लॅबोरेटरी (SCL), अरनेट इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी (NISE), अमृता विश्व विद्यापीठम, स्कायरुट एरोस्पेस, इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्च (IFMR) आणि किंड्रील इंडिया यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेष वाढविण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहकार्याचे क्षेत्र संयुक्त संशोधन प्रकल्प, अभ्यासक्रम विकास, क्षमता बांधणी, प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला सहयोग देण्यापर्यंत विस्तारलेले आहे.
एक मजबूत डिजिटल प्रणाली वृद्धिंगत करण्यासाठी तसेच भविष्यासाठी तयार असलेले कार्यबल विकसित करण्यासाठी शैक्षणिक, उद्योग आणि सरकारी संस्थांचे हे धोरणात्मक एकत्रीकरण आहे. डिजिटली सक्षम समाज आणि समृद्ध ज्ञान अर्थव्यवस्था घडवण्यासाठी यासारखे सहयोगी प्रयत्न आवश्यक आहेत असे मत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस. कृष्णन यांनी अशा सहकार्यांचे महत्त्व अधोरेखित करताना व्यक्त केले.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) बद्दल अधिक माहिती
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया (MeitY) अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.
56 स्वतःची केंद्रे, 700 हून अधिक मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदारांचे विशाल नेटवर्क आणि देशभरात 9,000 हून अधिक सुविधा केंद्रांसह, ही संस्था डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी कुशल मनुष्यबळ विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अनौपचारिक क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवणाऱ्या करणाऱ्या संस्थांना मान्यता देण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणून देखील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था ओळखली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी