माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून, भारताला ‘ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन’ बनवण्याचे स्वप्न या मंचाद्वारे प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद भारताच्या सृजनशील भविष्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे.
देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. १ ते ४ मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
१ मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ‘क्रिएटर हब’ म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.
‘WAVES 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E) उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.
संकलन
जिल्हा माहिती अधिकारी रायगड.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने