आगामी 4 वर्षात 3984.86 कोटींचा खर्च अपेक्षित
नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरा लाँच पॅड (टीएलपी) उभारणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज, गुरुवारी राज्यसभेत दिली. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 3984.86 कोटी रुपये मंजूर केले असून हा लाँच पॅड येत्या 4 वर्षांत पूर्ण होईल.
यासंदर्भात जितेंद्र सिंह म्हणाले की, इस्रो त्यांच्या नवीन 'नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल' (एनजीएलव्ही) वर काम करत आहे, जे 90 मीटर उंच आणि एक हजार टन वजनाचे असेल. सध्याचे लाँच पॅड इतके जड आणि मोठे रॉकेट लाँच करण्यास सक्षम नाहीत, म्हणून एक नवीन लाँच पॅड बांधले जात आहे. हे लाँच पॅड अशा प्रकारे डिझाइन केले जाईल की ते भविष्यात भारताच्या मानवयुक्त चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणास देखील सुलभ करू शकेल. नवीन लाँच पॅडमध्ये 'टिल्टेबल अम्बिलिकल टॉवर' (टीयूटी) असेल ज्याद्वारे रॉकेटला आडव्या स्थितीत तयार करता येईल आणि नंतर उभ्या स्थितीत आणता येईल. याशिवाय, एनजीएलव्ही पहिला टप्पा 9 इंजिनांच्या क्लस्टरसह तयार केला जात आहे, ज्याची लाँच पॅडवरच 'गरम चाचणी' केली जाईल, ज्यामुळे वेगळे चाचणी केंद्र बांधण्याची गरज दूर होईल.
राज्यसभेत दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, अहमदाबादस्थित स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (एसएसी) 1966 पासून इस्रोचे प्रमुख संशोधन युनिट म्हणून कार्यरत आहे. त्याची स्थापना डॉ. विक्रम साराभाई यांनी केली होती. चांद्रयान-3 मोहिमेसाठी उपग्रह तंत्रज्ञानाच्या विकासात, क्वांटम तंत्रज्ञानात, शेतीत, समुद्रशास्त्रात आणि आपत्ती व्यवस्थापनात एसएसीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. एसएसीने आतापर्यंत अनेक प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहेत, ज्यात नासा-इस्त्रो सिंथेटिक अपर्चर रडारसाठी (एनआयएसएआर) एस-बँड एसएआर, चांद्रयान-3 साठी लँडर आणि रोव्हर कॅमेरे, नेव्हिगेशन सिस्टम आणि कम्युनिकेशन उपग्रहांसाठी हाय-थ्रूपुट कम्युनिकेशन पेलोड्स यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली की एसएसी सध्या जीएसएटी-7आर, Resourcesat-3, Oceansat-3A, जी-20 उपग्रह, भारत-मॉरिशस संयुक्त उपग्रह (आयएमजेएस), जीएसएटी-एन 3 आणि आयडीआरएसएस-2 यासह अनेक महत्त्वाच्या उपग्रहांसाठी पेलोड विकसित करत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी