चेन्नई, 6 एप्रिल (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि.६) रामनवमीनिमित्त तामिळनाडूमध्ये देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सागरी पूल असलेल्या न्यू पंबन ब्रिजचं उद्घाटन केलं.तसेच पुलाखालून जाणारे तटरक्षक दलाचे जहाज आणि रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) या नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके हे दोन्ही नेते आज(दि.६) अनुराधापुरा इथे भारताच्या सहकार्याने बांधलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ समारंभात सहभागी झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी 91.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या, आणि भारताच्या सहकार्याने नूतनीकरण केलेल्या 128 किलो मीटर लांबीच्या माहो-ओमंथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी 14.89 अमेरिकन डॉलर खर्चाच्या आणि भारताकडून मिळालेल्या अनुदानाच्या मदतीने बांधल्या जात असलेल्या माहो ते अनुराधापुरा पर्यंतच्या प्रगत सिग्नल यंत्रणेच्या बांधकामाचेही उद्घाटन केले.
हे ऐतिहासिक रेल्वे आधुनिकीकरण प्रकल्प भारत - श्रीलंका विकास भागीदारीअंतर्गत राबवले गेले आहेत. हे प्रकल्प श्रीलंकेच्या उत्तर-दक्षिण भागातली रेल्वे जोडणी मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मैलाचा टप्पा ठरले आहे. या प्रकल्पांमुळे श्रीलंकेतील प्रवासी तसेच मालवाहतूक जलद आणि कार्यक्षम व्हायला मदत होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2.7 किलोमीटर लांबीचा हा पूल भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि दूरदर्शी पायाभूत सुविधांच्या विकासाचा पुरावा आहे.
रामनाथपुरम जिल्ह्यात स्थित हा पूल रामेश्वरम बेटाला मंडपमशी जोडतो. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवरत्न सार्वजनिक उपक्रम - रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे 700 कोटींपेक्षा जास्त खर्च करुन हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलात 72.5 मीटरचा नेव्हिगेशनल स्पॅन आहे जो वरती 17 मीटरपर्यंत उचलता येतो, ज्यामुळे जहाजं खालून सुरक्षितपणे जाऊ शकतात.
सध्या ट्रॅक एकाच मार्गावर सुरु असला तरी तो दोन रेल्वे ट्रॅकना देखील आधार देऊ शकतो, ताशी 80 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनसाठी हा मार्ग वापरता येणार आहे. तसंच पूल वाढती रेल्वे वाहतूक आणि जास्त भार सहन करु शकतो अशाप्रकारे उभारण्यात आला आहे. सरकारच्या दाव्यानुसार, या पुलाचं आयुष्मान 100 वर्षांचं आहे.
जुना पंबन पूल 1914 मध्ये ब्रिटिश इंजिनिअर्सनी बांधला होता. त्यात मॅन्युअली चालवल्या जाणाऱ्या शेरझर स्पॅनचा (एक प्रकारचा रोलिंग लिफ्ट ब्रिज) वापर करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल रेल्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानामुळे या नवीन पांबन पुलाची तुलना अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिज, युकेमधील टॉवर ब्रिज आणि डेन्मार्क आणि स्वीडनमधील ओरेसुंड ब्रिज यासारख्या प्रसिद्ध पुलांशी केली जात आहे.आता नवीन पांबन पूल देखील या प्रतिष्ठित पुलांच्या यादीत सामील झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode