नवी दिल्ली, 9 एप्रिल (हिं.स.) - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर तब्बल १०४ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने देखील अमेरिकेवर ८४ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी दोन्ही देशांतील व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. चीनच्या वित्त मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेवर लादण्यात आलेले टॅरिफ गुरुवार, १० एप्रिलपासून लागू होतील. यापूर्वी चीनने अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के टॅरिफ लावले होते.
अमेरिकेने चीनवर लादलेले टॅरिफ १०४ टक्के केल्यानंतर चीनने देखील त्यामध्ये ५० टक्क्यांची वाढ करुन ८४ टक्के केले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेच्या १२ संस्थांना निर्यात नियंत्रण यादीत टाकले आहे. याशिवाय सहा अमेरिकन कंपन्यांना अविश्वसनीय संस्थांच्या यादीत टाकलं आहे.
अमेरिकेने चीनवर १०४ टक्के टॅरिफ लादल्यानंतर त्याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला. अमेरिकेने लादलेले टॅरिफ ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होत आहेत. ट्रम्प यांच्या नवीन दराच्या अंमलबजावणीपूर्वी गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढली आणि त्याचा थेट परिणाम आज आशियाई बाजारावरही दिसू लागला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की, अमेरिकेच्या बाजूने चर्चेची प्रामाणिक इच्छा दिसून येत नाही. अमेरिकेला खरोखरच आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांनी समान सन्मान आणि लाभ या धोरणाचा स्वीकार करावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी