इस्लामाबाद , 30 मे (हिं.स.)।पाकिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ इतकी मोजण्यात आली आहे. आज, शुक्रवारी(दि. ३०) दुपारी पाकिस्तानमध्ये भूकंप झाला.भूकंपामुळे लोक घाबरून गेले. ते आपल्या घरांमधून बाहेर पळू लागले. दोन दिवसांपूर्वीही पाकिस्तानमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, पाकिस्तानमध्ये आज(दि.३०) दुपारी 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या उत्तरी भागात होता, मात्र सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किलोमीटर होती.
पाकिस्तानमध्ये आलेल्या या भूकंपाचे झटके इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या भागांमध्ये जाणवल्याचे सांगितले जात आहे. याआधीही पाकिस्तानमध्ये भूकंप झाले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची भूमी भूकंपाने थरथरली होती.या आठवड्यात पाकिस्तानमध्ये पृथ्वी हादरण्याची ही चौथी वेळ आहे.
यापूर्वी गुरुवारी ४.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मंगळवारी (२७ मे) संध्याकाळी ७:३० वाजता पाकिस्तानच्या फैसलाबाद विभागात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. गेल्या महिन्यातही देशात अनेक भूकंप झाले आहेत, जे एकामागून एक आले आहेत. मे महिन्यात देशातील हा चौथा भूकंप आहे. या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode