ढाका , 2 जून (हिं.स.) : बंगलादेशने १ जूनपासून नवीन बँक नोटा अधिकृतपणे जारी करण्यास सुरुवात केली असून, या नवीन नोटांवरून देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात आला आहे आणि त्याऐवजी, बौद्ध, हिंदू मंदिरं, ऐतिहासिक स्मारकं आणि कलाकृती यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमा वापरण्यात आल्या आहेत. बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी सांगितले की, नवीन नोटा देशाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारशाचे दर्शन घडवतील. यामध्ये मानवी प्रतिमांऐवजी वास्तुशिल्प, निसर्गदृश्ये आणि ऐतिहासिक स्मृतीस्थळे अधिक ठळक असतील. या नोटांमध्ये बौद्ध आणि हिंदू मंदिरांची चित्रं, प्रसिद्ध चित्रकार जैनुल आबेदीन यांची कलाकृती, तसेच राष्ट्रीय शहीद स्मारकाचा समावेश करण्यात आला आहे. या डिझाईनचा उद्देश १९७१ च्या मुक्तिसंग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे हा आहे. नवीन चलन बांगलादेश बँकेच्या मुख्यालयातून टप्प्याटप्प्याने देशभर वितरित करण्यात येणार आहे. या चलन बदलाला राजकीय पार्श्वभूमी असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. शेख मुजीबुर रहमान हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आहेत. जानेवारी २०२५मध्ये बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर शेख हसीनांना देश सोडावा लागला आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर, देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले असून नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांनी त्याचे नेतृत्व स्वीकारले आहे. बांगलादेशने राजकीय बदलांनंतर चलनात मोठा बदल करण्याची ही पहिली वेळ नाही. १९७२ मध्ये देशाने स्वतंत्रता प्राप्त केल्यानंतर प्रथम आपल्या नोटांवर नकाशा छापला होता. नंतरच्या काळात शेख मुजीब यांचे फोटो जवळपास सर्वच नोटांवर दिसू लागले. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत त्यांच्या वडिलांचा फोटो चलनावर कायम होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode