अबुजा, 31 मे (हिं.स.) पश्चिम आफ्रिकेतील नायजेरिया देशातील उत्तर नायजर राज्यात
मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान
झाले आहे. विशेषतः मोक्वा भागातील नैसर्गिक आपत्तीत किमान १५० लोकांचा मृत्यू
झाल्याचे समजते. शनिवारी सकाळी १५१ मृतदेह सापडले असून, त्यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.
राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते इब्राहिम
हुसैनी यांनी सांगितले की, या पुरामुळे ३,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी
वाढण्याची शक्यता आहे. मोक्वाचे रहिवासी २६ वर्षीय हसन अब्दुल्लाही यांनी सांगितले
की, त्यांच्या घरात पाणी
घुसल्याने त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये त्यांची आई, आणि वय ४ ते ८ वर्षांदरम्यानचे दोन भाचे व भाची यांचा
समावेश आहे. त्यांनी सांगितले की, “या पूरात सर्व
काही नष्ट झाले. सगळं सामानही वाहून गेले आहे.”
राष्ट्रपती बोला टीनूबू यांनी शोक व्यक्त करताना सांगितले की, केंद्र सरकार नायजर राज्यातील मोक्वा येथील पूरग्रस्त
नागरिकांना शक्य तितकी मदत पुरवेल. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र सक्रिय करण्यात आले
असून शोध व बचाव मोहीम सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर