नवी दिल्ली, 09 मे (हिं.स.) : पाकिस्तानने आज, शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन हल्ला केला. भारताच्या जम्मू, पठाणकोट, फिरोजपूर, श्रीनगर आणि राजस्थानचे जैसलमेर आणि पोखरणसह अनेक ठिकाणी ड्रोनने हल्ला केल्याचे समोर आले आहे. शत्रू देशाकडून केलेले हे हल्ले भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. जम्मू, पोखरण इत्यादी ठिकाणीही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.
सीमेपलीकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या नवीन घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारी रात्री जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात सीमेपलीकडून गोळीबार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला, ज्यामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला. सीमेपलीकडून मोर्टार डागण्यात आले. नौगाम हंदवाडा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरील (एक्स) पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी जिथे आहे तिथे अधूनमधून स्फोटांचे आवाज येत आहेत, कदाचित जड तोफखान्यांमधून मारा केला जात आहे.’ त्यांनी अंधारात बुडालेल्या शहराचा एक फोटो देखील पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये ‘जम्मूमध्ये आता ब्लॅकआउट आहे. संपूर्ण शहरात सायरनचा आवाज ऐकू येत आहे. पंजाबच्या पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूर, फाजिल्का, गुरुदासपूर, तरनतारण आणि राजधानी चंदीगडमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पठाणकोट आणि फिरोजपूरमध्ये अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. आपत्कालीन सायरन वाजत आहेत. पाकिस्तानने दोन्ही ठिकाणी ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने ते हवेतल्या हवेतच पाडले. गेल्या काही दिवसांत पठाणकोटमध्ये झालेला हा चौथा हल्ला आहे. यावेळीही पाकिस्तानी ड्रोनने हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच नष्ट करण्यात आला. अमृतसर, फाजिल्का, गुरुदासपूर सारखी पंजाबमधील अनेक शहरे देखील ड्रोन कारवायांमुळे प्रभावित झाली. अनेक भागात मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूर, फाजिल्का, गुरुदासपूर, तरनतारन आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये खबरदारी म्हणून ब्लॅकआउट लागू करण्यात आला. सुरक्षा दलांची तैनाती आणि देखरेख वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, पठाणकोट आणि फिरोजपूरमध्ये अधूनमधून स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. आपत्कालीन सायरन वाजवण्यात येत असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी