मुंबई, 9 मे (हिं.स.)। विराट कोहली आणि त्याच्या चाहत्यांवरील टीकेवरून गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विराटने इंस्टाग्रामवरून त्याला ब्लॉक केल्याचा दावा राहुलने केला आहे.तर अवनीत कौर प्रकरणावरूनही राहुलने विराटची खिल्ली उडवली. त्यातच त्याने विराट आणि त्याच्या चाहत्यांना जोकर म्हटलं. यावरून विराटचा मोठा भाऊ विकासने त्याला खडेबोल सुनावले.
विराट आणि राहुलमधील ऑनलाईन वादावर पहिल्यांदाच कोहली कुटूंबाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. या आधी राहुलने अनेकदा ट्रोल करूनही विराट आणि त्याच्या कुटूंबाने कधीच या टीकेवर उत्तर दिलं नव्हतं. पण राहुलच्या या वागण्यामुळे विराटच्या भावाचा संयम तुटला असून पहिल्यांदाच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची कानउघाडणी केली.
बाळा इतकी मेहनत जर तू तुझ्या गाण्यावर घेतली असती तर प्रसिद्ध झाला असतास. संपूर्ण देशाचं लक्ष सध्याच्या परिस्थितीवर आहे. देशात काय सुरु आहे आणि हा मूर्ख अधिक फॉलोअर्स मिळवण्यासाठी विराटच्या प्रसिद्धीचा वापर करतोय. काय लुजर आहे. अशी पोस्ट विराट कोहलीचा मोठा भाऊ विकासने केली आहे. सोशल मीडियावर हा स्क्रिनशॉट चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट करत विकासने राहुलला योग्य उत्तर दिल्याचं म्हटलं.
या आधी अवनीत कौरवरून राहुलने विराटला छेडलं. माझं अकाऊंट सुद्धा अवनीतप्रमाणे अल्गोरिदममुळेच ब्लॉक झालं असणार असं राहुलने म्हटलं. त्यानंतर जेव्हा विराटच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं तेव्हा त्याने तुम्ही मला ट्रोल करत आहात ठीक आहे पण काहीही कारण नसताना माझी बहीण आणि माझ्या पत्नीला यात खेचताय ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. हे चुकीचं आहे. म्हणूनच मी म्हणतो, विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर आहेत.
गेल्या वर्षी राहुलने सोशल मीडियावर पोस्ट करत विराटने त्याला विनाकारण इंस्टाग्रामवरून ब्लॉक केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर अनेकदा त्याने या प्रकरणावर भाष्य केलं पण विराटकडून किंवा त्याच्या टीमकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode