नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) : भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल करत आहे, जे पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांना संधी देण्यासाठी केले आहेत.
आगामी जुलै महिन्यापासून तात्काळ तिकीट ऑनलाइन बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात येणार आहे. याशिवाय, आरक्षण काउंटरवर आणि अधिकृत एजंट्सकडून तिकीट बुक करताना ओटीपी (वन-टाइम पासवर्ड) प्रमाणीकरण लागू होईल.एजंट्सना तत्काळ बुकिंगच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांत बुकिंग करण्यावर बंदी असेल, जेणेकरून सामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढेल. ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असेल. जुलै 2025 पासून आयआरटीसीच्या वेबसाइट आणि मोबाईल ऍपवर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार नंबर लिंक करणे आणि यशस्वी प्रमाणीकरण करणे अनिवार्य होणार आहे.
येत्या 15 जुलै पासून तिकीट बुक करताना ऑनलाइन, काउंटरवर तसेच अधिकृत एजंट्सकडून ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक होईल. अधिकृत एजंट्सना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटांत तिकीट बुक करण्यास मनाई असेल. रेल्वेच्या एसी-कोचच्या तिकीटांसाठी सकाळी 10 ते 10.30 यावेळेत आणि स्लिपर क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
तत्काळ तिकीटासाठी इच्छुक ग्राहकांना आयआरटीसी युजर प्रोफाईलमध्ये आधार क्रमांक लिंक करून त्याचे प्रमाणीकरण करावे लागेल. तसेच तिकीट बुकिंगचा ओटिपी रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी