आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड, 13 जून (हिं.स.)।मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील आधार केंद्रावर नागरिकांची खूप गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्व शासकीय योजनांच्या मुळाशी आधार असून ते अपडेट नसेल तर नागरिकांना योजनांचा ल
आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या - नांदेड जिल्हाधिकारी


नांदेड, 13 जून (हिं.स.)।मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील आधार केंद्रावर नागरिकांची खूप गर्दी दिसून येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सर्व शासकीय योजनांच्या मुळाशी आधार असून ते अपडेट नसेल तर नागरिकांना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आधार केंद्र चालकांनी आधार नोंदणी व सुधारणा केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा पुरवाव्यात. आधार केंद्र चालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीत अधिक सुधारणा करून नागरिकांच्या सोयीसाठी जबाबदारीने काम करावे. नागरिकांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी चालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.

नागरिक अनेकदा आधार अपडेट अथवा नवीन नोंदणीसाठी आधार केंद्रात येतात. मात्र, वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. केंद्रावर उपस्थित कर्मचारी यांनी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना सेवा द्यावी. तसेच याबाबत काही अडचणी किंवा शंका असतील तर त्या भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाचे सहायक प्रबंधक, यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे महेश शिंदे यांच्या मदतीने सोडवाव्यात. आधार नोंदणी करताना येणाऱ्या शंका व अडचणीचे निरसन करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी कर्डीले यांनी स्पष्ट सांगितले.तालुक्याच्या ठिकाणी जे आधार नोंदणी केंद्र आहेत तिथे संबंधित तहसिलदारांनी भेट देवून पाहणी करावी. ज्या आधार केंद्र चालकांची कामगिरी सुमार दर्जाची आहे त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करुन घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.यावेळी मुंबई यूआईडीएआई क्षेत्रीय कार्यालयाचे महेश शिंदे यांनी आधार केंद्र चालकांना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. आधार केंद्र चालकांनी दैनंदिन कामकाज पार पाडताना येणाऱ्या शंका व अडचणी सोडविण्यासाठी प्रश्न विचारले त्यावर त्यांच्या अडचणी व शंकाचे निरसन केले. नवीन आधारकार्ड तयार करणे व सुधारणा करतांना महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक बाबींची माहिती यावेळी दिली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande