योगविद्या ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. भारतीय योगसाधनेला सुमारे पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. योग हा प्राचीन भारताचा अनमोल ठेवा आहे. शरीर व मन यांच्यातील आंतरिक नात्याला योगाभ्यासात अनन्यसाधारण महत्व आहे. मानवी जीवनात मानसिक संतुलन, समग्रता, आत्मशांती, शारीरिक स्वास्थ्य लाभणे, ही योगाभ्यासाची मुख्य उद्दिष्टे आहेत. योग हा मूळ संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ जोडणे वा जुळविणे असा होतो. योग विद्येतून शरीर व मन या दोन घटकांना एका धाग्यात ओवून त्यांच्यात मेळ घातला जातो. थोडक्यात योग मार्गाचा अवलंब केल्याने निरोगी आरोग्य लाभून निरामय जीवनाची दृष्टी लाभते, हे त्रिकाल सत्य आहे.
सध्याच्या धावत्या जगात माणसात ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच आधुनिक विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाच्या जीवनशैलीत (लाईफस्टाईल) आमूलाग्र बदल होताहेत. त्यामुळे काही प्रमाणात युवकांमध्ये चंगळवाद वाढीस लागला आहे. जेवणाच्या ताटात चौरस आहाराची जागा आता पिझ्झा, बर्गर, चायनीज फूडने घेतली असल्याचे सर्वत्र आढळते. त्यात स्पर्धात्मक युगाची भर पडली आहे. परिणामी युवकांच्या स्वास्थ्यावर याचे विपरित परिणाम होत असल्याचे प्रकर्षाने दिसते. अशा ताणतणावाच्या कारणांमुळे भारत ही आता जगाची मधुमेहाची राजधानी झाली आहे. आजच्या युवा पिढीच्या आहारामधील जंक फूडचे वाढते प्रमाण बघता, मधुमेहसह रक्तदाब, लठ्ठपणा, ॲसिडीटी हे विकार जडत चालले आहेत. हे सर्व घालविण्यासाठी योग साधना करणं काळाची गरज बनली आहे.
स्पर्धेच्या युगात युवा वर्गात नोकरी, व्यवसायसंदर्भात मोठा ताणतणाव असतो. या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातून ताणतणावाच्या गोष्टी कायमच्या हटविण्यासाठी योगसाधनेची कास धरणे आवश्यक आहे. कारण त्यातून मन स्थिर तर, शरीर चपळ व सुदृढ होण्यास बळ मिळते.
भारत हा साऱ्या जगात युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. केवळ भारताच्या युवा पिढीचेच नव्हे तर अन्य वयोगटातील व्यक्तींचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य निरोगी व सुदृढ रहावे, या प्रांजळ उद्देशाने, पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी दि.27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत योगाभ्यासाचा प्रस्ताव मांडत त्याचे महत्त्व अन् उपयुक्तता विशद केली. योगाभ्यासामुळे मानवाच्या जीवनात लक्षणीय परिणाम होऊन त्यात आमूलाग्र परिवर्तन होते, हे जगाच्या प्रतिनिधींना त्यांनी पटवून दिले. त्याची परिणीती म्हणजे त्यांच्या प्रस्तावास व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळून सुमारे 170 देशांनी त्यास मान्यता दिली. अंतत: 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास संयुक्त राष्ट्र संघाने मंजुरी दिली. ही गोष्ट भारताच्या दृष्टीने मोठ्या सन्मानाची आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानणे क्रमप्राप्तच ठरते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनतेला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर, योगाभ्यासाचा अंगिकार करूया अन् आपले मन व शरीर सुदृढ व निरोगी बनवूया!
लेखक:-
रणवीर राजपूत
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर