* पार्टी नव्हे परिवार, संस्था नव्हे संस्कार !
श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांनी एकदा एका बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याने 'दादा' बनावे असे सांगून त्यांनी दादा शब्दाची उकल केली होती. इंग्रजी भाषेत 'दादा' या शब्दाचे स्पेलिंग DADA असे होते. यातील पहिला D हा Destination चा. नंतरचा A हा attitude चा तर पुढचा D हा direction चा. शेवटचा A हा Administration चा, अशी ती उकल होती.
एकदा ध्येय, गंतव्य स्थान निश्चित करणे. त्यानुसार वर्तणूक असावी. अंगी ध्येयाचा संचार असावा. आपली ध्येयाप्रत वाटचाल सुरु आहे की नाही यासाठी सतत आपली दिशा तपासावी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ध्येयाला अनुकूल संघटना आणि प्रशासन तयार करावे. हे सारे जो करेल तो कार्यकर्ता खरा 'दादा' !
भाजपाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे भाग्य आहे की त्यांना संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी असाच दादा आता लाभला आहे. रवीदादा ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार एका तरुण नेत्याच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर हा 'रवी' नावाचा 'दादा' माणूस उदयाला आला ! म्हणजेच भाजपाचे होऊ घातलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आ. रवींद्र चव्हाण. ते अध्यक्ष होणार याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी दिले होतेच. लोकशाही पद्धतीने आज रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्याच्या मुंबई येथे आयोजित विशाल अधिवेशनात त्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा होईलच. नेता नावारूपाला आला की त्याला 'जी', 'साहेब' आपोआपच लावले जाते. पण या नेत्याच्या संपर्कात असलेल्या हजारो कुटुंबांनी त्यांना आपल्या आयुष्यात प्रेमपूर्वक 'दादा' हे स्थान दिले. चार टर्म आमदार म्हणून विजयी झाल्यावर आणि राज्याच्या मंत्री मंडळात कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला असताना रवीदादांची पुन्हा मंत्री म्हणून वर्णी लागणे अशक्य नव्हते. मंत्रीपद सहजतेने त्यांच्या वाट्याला आले असते. पण सत्ता काळात संघटनेच्या इच्छेनुसार दिली ती जबाबदारी स्वीकारणे हे इतर संघटनांमध्ये सापडणे आजच्या काळात कठीण दिसते आहे. हे भाजपा आणि संघ विचार वर्तुळात सहजपणे घडते. राज्यात विकासाचा झंजावात उभा करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक समर्थन प्राप्त असताना मा. देवेंद्रजी फडणवीस संघटनेच्या आवश्यकतेसाठी क्षणाचाही विलंब न लावता, आढेवेढे न घेता मुख्यमंत्र्याऐवजी उपमुख्यमंत्री पद स्वीकारतात हे आदर्श उदाहरण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ताजे आहे. त्यांनी नुसते उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही तर ते सरकार सुरळीत चालावे यासाठी वेळप्रसंगी स्वतःला प्रकाशझोतात न येऊ देता आपली संपूर्ण क्षमता पणाला लावली. नंतरच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या परिश्रमांवर, बहुआयामी नेतृत्व क्षमतेवर शिक्कामोर्तब तर केलेच पण देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झालेच पाहिजे हा जनमताचा रेटा महायुतीला मिळालेल्या प्रचंड मताधिक्याच्या मागे होता, हे आपल्याला नाकारता येणार नाही. देवेंद्रजींच्या पाठोपाठ लक्षावधी कार्यकर्त्यांसमोर रवीदादा चव्हाण यांनी देखील असाच आदर्श प्रस्थापित केला आहे. केवळ पक्षाची ईच्छा म्हणून जबाबदारी स्वीकारायची नाही तर झोकून देऊन त्या जबाबदारीला न्याय देण्याची सिद्धता त्यांनी केली. महाराष्ट्रात देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि रवीदादांकडे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आली. तेंव्हापासून क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी राज्यभर दौरे केले. संघटन पर्वात कार्यकर्त्यांची अफाट शक्ती एकत्र केली आणि ऐतिहासिक सदस्यसंख्या नोंदवण्याचा विक्रम त्यांनी केला.
रवीदादा चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वात काही बाबी आवर्जून जाणवतात. रवीदादा नुसते राजकारणी नाही. त्यांचा उपजत पिंड समाजसेवेचा आहे. एकूणच समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर करायचे आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा राजकारणातील सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला रवीदादा अपवाद आहेत. आपल्या समाजकार्यात दिखावा नसावा. समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. समाजकारण हे दाखवण्यासाठी करायचे नाही तर ते कर्तव्य म्हणून करायचे. त्यामागे आपली सामाजिक बांधिलकीची प्रामाणिक भावना असावी आणि राजकारणात केवळ मुत्सद्देगिरी करण्यापेक्षा राष्ट्रहिताशी, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्याकडे आलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची. तिला पूर्ण न्याय द्यायचा. केवळ बातम्यांच्या प्रकाशझोतात राहण्याच्या नादात न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हे रवीदादांचे कसब आहे. आपल्या डोक्यात दररोज चोवीस तास पक्षाचा विचार असला पाहिजे. आपली ओळख ही कायम भाजपाचा कार्यकर्ता हीच असली पाहिजे. याच भूमिकेत कायम असावे म्हणून रवीदादा कायम आपल्या शर्टवर 'कमळ' लावतात. त्यांच्या निकट संपर्कात आलेले कार्यकर्त्यांचे किंवा इतर नागरिकांचे कुटुंबीय खुल्या मनाने रवीदादांच्या या गुणांची भरभरून प्रशंसा करतात. यातूनच त्यांनी अनेक परिवारांशी आपले घप्प नाते जोडले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपार श्रद्धा असलेले रवीदादा समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वागण्यातून 'मॅन ऑफ मिशन' म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. भाजपा युवा मोर्चापासून आपल्या कार्याला प्रारंभ केलेले रवीदादा आज भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावर पोहचले आहेत. नगरसेवकापासून तर राज्यात मंत्री पदापर्यंतचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. २००९ नंतर २०१४, २०१९ आणि २०२४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग डोंबिवलीच्या आमदारकीचा विजयी चौकार त्यांनी मारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. तेव्हा रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पुढे २०१६ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या ४ खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांच्या घराच्या जागेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवायला काही तांत्रिक अडचणी होत्या. त्यांच्या यातना ज्या वेळी रवीदादांच्या समोर आल्या तेव्हा त्यांनी तमा न बाळगता स्वतःच्या मालकीची जमीन त्या कातकरी कुडुंबियांना दान केली हे उदाहरण त्यांच्या संवेदनशीलतेचा परिचय देण्यासाठी पुरेसे आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण असो, काश्मीरचा विषय असो की हिंदुत्वाचा कुठलाही विषय असो रवीदादा अग्रक्रमाने आघाडीवर असतात. वर्तमानात डोंबिवलीतील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्रातील देवदुर्लभ भाजपा कार्यकर्त्यांना एकत्रित करून 'पार्टी नही परिवार है, संस्था नही संस्कार है !' या दिशेने हे चतुरस्त्र नेतृत्व भाजपाला अधिक लोकाभिमुख करेल या विश्वासासह रवीदादांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
- शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी